Talegaon Dabhade: तळेगावच्या राजकारणात मोठा खळबळ! ‘या’ नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध; पद धोक्यात?
Talegaon Dabhade: जमीन हक्क परिषदेच्या उपस्थितीत सरोदे यांनी मांडली बाजू; समितीच्या निर्णयामुळे आगामी काळात कायदेशीर आणि राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.

Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक मजनू नाटेकर यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवली, अशी माहिती तक्रारदार करुणा सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे तळेगावातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून मजनू नाटेकर यांनी निवडणूक लढवून विजय मिळविला होता.
निवडणुकीदरम्यान नाटेकर यांनी सादर केलेल्या जातविषयक कागदपत्रांबाबत आक्षेप घेत करुणा सरोदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी संबंधित तक्रार फेटाळण्यात आली होती. यानंतर सरोदे यांनी पुणे येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाद मागितली. समितीसमोर झालेल्या सुनावणीनंतर १५ जून २०२६ रोजी निर्णय देण्यात आला. या निर्णयानुसार, निवडणुकीच्या वेळी नगरसेवक पदासाठी नाटेकर यांनी सादर केलेला जात प्रमाणपत्राचा पुरावा वैध नसल्याचे समितीने नमूद केले आहे.
तसेच संबंधित जात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सरोदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जमीन हक्क परिषदेचे संस्थापक माऊली सोनवणे, मावळ तालुका अध्यक्ष दिनकर शेटे, कार्याध्यक्ष तानाजी पडवळ, सुनील गुजर आदी उपस्थित होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मजनू नाटेकर यांनी सादर केलेला जात प्रमाणपत्राचा पुरावा अवैध ठरवल्यानंतर तळेगाव दाभाडे परिसरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयाचे आगामी राजकीय आणि कायदेशीर परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



