Water Leakage: दुष्काळात तेरावा महिना! फर्ग्युसन आणि निलायमजवळ जलवाहिनी फुटली; हजारो लीटर पाणी रस्त्यावर
Water Leakage: दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पुणेकर त्रस्त असतानाच शहरात दोन ठिकाणी मोठी गळती; एफसी रोडवरील नवीन टाकीचा व्हॉल्व्ह खराब.

Water Leakage : दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने पुणेकर त्रासलेले असतानाच शहरात दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलवाहिनीतून गळती होऊन पाणी वाया गेले. पहिल्या घटनेत फर्गसन महाविद्यालया समोरील मुख्य जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सकाळी हजारो लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे, या जलवाहिनी गळत असल्याचे प्रशासनाच्या दोन दिवस आधीच निदर्शनास आले होते.
त्यानंतर दुरूस्तीऐवजी केवळ खोदाई करून ही जलवाहिनी तशीच ठेवली. शनिवारी सकाळी तिच्यावर पाण्याचा दाब आल्याने ती फुटल्याने मोठया प्रमाणात पाणी वाया गेले. नागरिकांनी महापालिकेस ही माहिती कळविल्यानंतर जलवाहिनीचा मुख्य व्हाॅल्व बंद केला. नंतर पाणी पुरवठाही बंद केला. सकाळच्या वेळेत हा प्रकार घडल्याने मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.
त्यामुळे तेथे वाहतूक कोंडीही झाली. एवढ्या मोठया प्रमाणावर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पाणी कपात सुरू असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणार नाही याची पालिकेने खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे. पर्वती जलकेंद्रातून शहराच्या मध्यवर्ती पेठांना पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हाॅल्वलाही गेल्या दोन दिवसांपासून गळती सुरू असल्याने शेकडो लीटर पाणी वाय जात आहे.
निलायम चित्रपटगृहाच्या जवळ आंबील ओढ्याच्या बाजूने ही जलवाहिनी असून त्यावर असलेला एअर व्हाॅल्व मागील दोन दिवसांपासून गळत असल्याने तेथून पाणी वाया जात आहे. शहरातील अनेक नागरिकांनी ही माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागास दिली असली तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या संकटात वाया जाणाऱ्या पाण्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
समान पाणी योजनेत फर्गसन महाविद्यालयाच्या मागील बाजूस बांधलेल्या नवीन टाकीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्यासाठी ही जलवाहिनी आहे. तिचा जुना व्हॉल्व खराब झाला होता. त्यामुळे, दुरुस्तीचे काम करण्यासाठी खोदाई केली होती. पाण्याच्या दाबामुळे व्हॉल्व्हमधून पाण्याचा गळती झाली.
– नंदकिशोर जगताप ( पाणी पुरवठा विभाग प्रमुख)






