MLC Election 2026 : महायुतीत नवा ट्विस्ट..! शिवसेना आमदाराची मुलगी विधान परिषदेच्या रिंगणात; तटकरे गटाची वाढली धाकधूक
MLC Election 2026 : शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसतानाच, शिवसेनेने मोठी खेळी केली आहे.

MLC Election 2026 : कोकणातील एकमेव विधान परिषद जागेवरून महायुतीतील रस्सीखेच आणखी तीव्र झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अद्याप एकमत न झालेलं असतानाच शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे. (MLC Election 2026)
जुईली दळवी यांनी आज शिवसैनिकांसह रत्नागिरी येथे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीकडून अखेर कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचे नावही या जागेसाठी चर्चेत असून तटकरे कुटुंबाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. (MLC Election 2026)
दरम्यान, शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पालकमंत्रिपदाच्या राजकारणातून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही तडजोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने दळवी गट सतर्क झाला आहे. त्यातूनच जुईली दळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (MLC Election 2026)
याबाबत बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, पक्षाचे हित लक्षात घेऊन मुलीला अर्ज भरायला सांगितला आहे. अंतिम निर्णय पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेतृत्व घेईल. मात्र कोणत्याही प्रकारची फाजील तडजोड स्वीकारली जाणार नाही. तटकरे गट शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलतो, त्यामुळे खबरदारी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (MLC Election 2026)
कोण आहेत जुईली दळवी?
- अलिबाग-मुरूड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या.
- अलिबाग मतदारसंघात सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये सक्रिय सहभाग.
- २०१९ मध्ये अलिबाग पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले.
- स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका.
कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीतील संघर्ष शिगेला पोहोचला असून, अंतिम क्षणी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (MLC Election 2026)





