PMC News : नगरसेवकांचा भरणार ‘क्लास’! महापालिका कारभाराचे धडे देण्यासाठी पुण्यात विशेष ट्रेनिंग
PMC News : महापालिका अधिनियम, सभा कामकाज नियमावली आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया प्रशासनाकडून समजावून सांगितली जाणार.

PMC News – महापालिकेच्या तब्बल चार वर्षे रखडलेल्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये पार पडल्यानंतर फेब्रुवारीपासून नवीन सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाले आहे. नव्या सभागृहातील १७५ पैकी तब्बल ११२ नगरसेवक प्रथमच निवडून आलेले असल्याने महापालिका अधिनियम, सभा कामकाज नियमावली, अर्थसंकल्पीय प्रक्रिया तसेच प्रशासनाशी समन्वय याबाबत त्यांना माहिती मिळावी,
या उद्देशाने महापालिकेकडून शुक्रवारी (२९ मे) एकदिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांची कामे करताना अडचणी येऊ नयेत आणि लोकप्रतिनिधींना प्रशासनाची रचना व प्रक्रिया समजावी, हा प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्य इमारतीतील नवीन इमारतीमधील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:१५ या वेळेत होणार आहे.
याबाबतचे पत्र अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी नगरसचिवांना पाठवले आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, समिती अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात माजी नगरसचिव सुनील पारखी, माजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, माजी सह महापालिका आयुक्त अंबरीश गालिंदे,
शहर अभियंता अनिरूध्द पावसकर तसेच माजी महापौर अंकुश काकडे हे वेगवेगळ्या विषयांवर नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिकेचे कामकाज, नियम, कायदे आणि प्रशासनाशी समन्वय कसा साधावा याचे सखोल ज्ञान नव्या सभासदांना मिळावे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी स्पष्ट केले.





