PMC News : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाचा मुहूर्त ठरला! भाजपचा ‘हा’ दिग्गज नेता शर्यतीत सर्वात पुढे?
PMC News : स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग; ज्येष्ठ नगरसेवकाच्या नावाची मोठी चर्चा.

PMC News – स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी ही माहिती दिली. पुणे महापालिकेत स्थायी समिती सह ७ विषय समित्या अस्तित्वात आल्या आहेत.
या समित्यांवर सदस्य नियुक्त करण्यात आले असून, आता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बाकी आहे. ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यानंतर बाकी समित्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते. त्यासाठी विभागीय आयुक्तांना तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी सोमवार २३ फेब्रुवारीला सकाळी ११:३० वाजता निवडणूक घेण्याची वेळ दिली आहे.
निवड की बिनविरोध
दरम्यान, १६ सदस्यांच्या स्थायी समितीत १२ सदस्य भाजपचे असल्याने समिती अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. पक्षाकडून रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, श्रीनाथ भिमाले, मयूरी कोकाटे, डॉ. दादा कोद्रे, वृषाली कामठे, निशा मानवतकर आणि संदीप बेलदरे यांची नियुक्ती केली आहे.
यामध्ये भिमाले हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने महापौर निवड बिनविरोध करावी, अशी विनंती काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीला केली होती.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुढील आठवड्यात २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही निवड प्रक्रिया होणार असून, स्थायी समितीच्या विशेष सभेत ही प्रक्रिया होणार आहे. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.





