PMC News: बदलीनंतरही टेबल खुर्ची सोडवेना! महापालिका कर्मचाऱ्यांची बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ
PMC News: राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप अन् कर्मचाऱ्यांची दांडी; बदली रोखण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत कर्मचाऱ्यांचे जुन्याच जागेवर ठाण.

PMC News: पुणे महापालिकेतील नियतकालिक बदल्यांनंतरही काही कर्मचारी नवीन खात्यात रुजू होण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. बदली होऊनही जुन्याच खात्यात ठाण मांडून बसल्याने अनेक विभागाचे कामकाज रखडले आहे. तर, या कामगारांच्या जागी जे कर्मचारी आलेले आहेत. त्यांनाही नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू करून घेतले जात नसल्याने कामे ठप्प झाली आहे.
अशा कर्मचाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधितांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश खातेप्रमुखांना देण्यात आले आहेत. महापालिका आस्थापनेवरील उप अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या करण्यात आल्या होत्या.
संबंधित आज्ञापत्रानुसार बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन खात्यात प्रत्यक्ष रुजू होणे तसेच त्याचा अहवाल ७ ऑगस्टपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, मुदत संपून तब्बल २० दिवस उलटूनही काही कर्मचारी अद्याप बदलीच्या खात्यात रुजू झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या बदली आदेशालाच केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी खातेप्रमुखांना कडक सूचना दिल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन खात्यात रुजू होण्याची कार्यवाही करावी आणि रुजू झाल्याचा अहवाल आस्थापना विभागाकडे त्वरित सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच, भविष्यात याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास बदली आदेशातील निर्देशानुसार दोन्ही संबंधित खात्यांतील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.
राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप ?
बदली हा सर्वस्वी प्रशासकीय नियोजनाचा भाग असताना राजकीय हस्तक्षेपाचा आधार घेत हे कर्मचारी बदलीच्या जागी जात नसल्याचे चित्र आहे. बदलीनंतर हे आदेश रद्द करून घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांकडून महापालिका पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, एकदा रुजू झाल्यास नंतर पदाधिकारी काहीच करू शकणार नसल्याने अनेक कर्मचारी रजा टाकून घरीच आहेत.
तर अनेक जण आपल्या जुन्याच जागेवर खुर्च्या उबवत आहेत. तसेच, बदली रोखण्यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे. याची प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, आता थेट रुजू होण्यासाठी मुदतच देण्यात आली आहे.






