PMC News: नवे पदाधिकारी, नवा थाट! चार महिन्यांत कार्यालयांच्या सुशोभीकरणावर दीड कोटींचा खर्च
PMC News: प्रशासकीय राजवट संपल्यानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन सभागृहातील पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासनाकडून कोटींचा खर्च.

PMC News – महापालिकेची तब्बल चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, या नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे नुतनीकरण तसेच सुशोभिकरणाच्या कामासाठी तब्बल १.४४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.
या कामामध्ये मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार, एंट्रन्स लॉबी, सुरक्षा कक्ष, सीसीटीव्ही कक्ष, स्वागत कक्ष, अंतर्गत सजावट, फर्निचर, रंगकाम आणि फरशी बदलण्याची कमे अशा कामांचा समावेश असल्याचे भिमाले यांनी सांगितले. महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मुख्य इमारत आणि पार्किंग व्यवस्थेच्या सुधारणा कामांसाठी ६.८० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निधीतून संबंधित खर्च भागविला जाणार आहे.
चार वर्षे कार्यालये बंद…
मागील महापालिकेची मुदत १५ मार्च २०२२ मध्ये संपली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणाच्या याचिकांची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याने या निवडणूका रखडल्या होत्या. मात्र, आॅक़्टोबर २०२५ मध्ये न्यायालयाने निवडणूकांचा मार्ग मोकळा केल्यानंतर पुढील काही महिन्यातच निवडणूक प्रक्रीया पार पडली. मात्र, या चार वर्षांच्या कालावधीत प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंदच होती.
तर निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात पक्षीय बलबालात बदल झाल्याने काही पक्षांना मोठ्या कार्यालयांची गरज पडली. त्यानुसार, कार्यालयांमध्ये बदल करण्यात आले तसेच राजकीय पक्षांकडूनही प्रशासनाकडे काही बदलांची मागणी केली होती. त्यानुसार, हा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.





