PMC Tree Plantation: वृक्षतोडीत तत्पर, लागवडीत मात्र सुस्त; महापालिकेची ‘समृद्ध पुणे’ मोहीम फक्त कागदावरच
PMC Tree Plantation: महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना किमान एक झाड लावून २ वर्षे संगोपन करण्याचे होते बंधन; पर्यावरण दिनानंतर एकानेही अहवाल दिला नाही.

PMC Tree Plantation : वाढते तापमान, घटते हरित क्षेत्र आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने हरित पुणे, समृद्ध पुणे ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना किमान एक वृक्ष लावणे तसेच दोन वर्षे संगोपन करणे बंधनकारक केले होते. पर्यावरण दिनी ५ जून रोजी अभियानास प्रारंभही झाला. त्यानंतर प्रत्यक्षात एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्ष लागवड केल्याची नोंद नाही. विकासकामांसाठी तत्पर वृक्षतोड करणारी पालिका वृक्षलागवडीबाबत एवढी उदासीन का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मोहीम कागदावरच
शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत पावसाळ्यात स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले होते. त्यात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने किमान एक वृक्ष लावणे अपेक्षित होते. वृक्षारोपणच नव्हे तर त्याचे पुढील दोन वर्षे संगोपन करून तो जिवंत राहील याची जबाबदारी संबंधितांवर होती. लावलेल्या झाडाचे स्थान, प्रजाती आणि छायाचित्रांसह माहिती वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अद्याप एकाही कर्मचाऱ्याने असा अहवाल सादर केला नसल्याने मोहीम कागदावरच राहिल्याचे दिसते.
पुणेकरांचा पुढाकार, पण…
पालिकेने पुणेकरांनाही पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. त्याचा एक भाग म्हणून उद्यान विभागामार्फत पाच रुपयांत पाच-सहा वर्षे वाढ झालेली देशी झाडे देण्याची सोय केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २० हजार रोपांची विक्री झाली आहे. एकीकडे पुणेकर पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे पालिका स्वतःच्या मोहिमेकडे पाठ फिरवत आहे.
अहवाल मागविले
आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सर्वांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सर्व विभागांकडून पुन्हा एकदा माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.





