PMC News : महापालिकेच्या मिळकती, पूल, पादचारी पूल तसेच पथदिव्यांवर जाहिरात फलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने जाहिरातदार कंपन्यांचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार शहरातील तब्बल ४ हजार २९९ ठिकाणी सुमारे २ लाख ७१ हजार १५२ चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, या प्रस्तावाच्या अटी आणि पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्वरूपावरून हा प्रस्ताव वादात सापडण्याची शक्यता आहे. या संदर्भात सहभाग घेणाऱ्या कंपन्यांच्या शंकानिरसनासाठी प्री-बीड (निविदापूर्व) बैठक घेण्यात आली असून त्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. काय आहे प्रस्ताव? गेल्या काही वर्षांत पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झाले आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असून स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकाराने विविध मिळकतींमध्ये जाहिरात फलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शहर ३२ विभागांत विभागण्यात आले आहे. पुणे महापालिका त्यामध्ये पादचारी पूलांवर ८ ठिकाणी, मिळकतींमध्ये २०० ठिकाणी, उड्डाणपुलांवर २८ ठिकाणी, भुयारी मार्गांमध्ये १२ ठिकाणी, नागरी सुविधा असलेल्या २५ ठिकाणी, तसेच पथदिव्यांवर ४ हजार २३ ठिकाणी जाहिरातींसाठी जागा दिली जाणार आहे. या सर्व जागांसाठी एकच कंपनी नियुक्त केली जाणार आहे. अटींवरून वादाची शक्यता या प्रस्तावात सहभागी होण्यासाठी संबंधित कंपनीची जाहिरात व्यवसायातील उलाढाल किमान १०० कोटी रुपये असावी आणि ती सलग पाच वर्षे टिकून असावी, अशी अट घातली आहे. तसेच संबंधित कंपनीकडून कोणतेही भाडे न आकारता, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ३० टक्के हिस्सा पालिकेला देण्याची अट आहे. या दोन्ही अटींवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्धवट अभ्यासावर निर्णय नको जाहिरातीद्वारे उत्पन्न वाढविण्यासाठी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण धोरण आवश्यक आहे. मात्र, पुरेसा अभ्यास न करता निर्णय घेऊ नये, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भात उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदन दिले आहे. उत्पन्नाची अचूक गृहितके निश्चित करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.