PMC News : पुणेकरांसाठी गूड न्यूज! महापालिकेची ‘ही’ ११ दवाखाने होणार हायटेक..जाणून घ्या
PMC News : पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधेला मिळणार नवसंजीवनी; ९० कोटींच्या तरतुदीतून ११ दवाखान्यांचे होणार जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर.

PMC News – पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी शहरातील ११ महापालिका दवाखान्यांचे अत्याधुनिक जनरल रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार सहा प्रसूतिगृहे आणि पाच बाह्यरुग्ण विभाग असलेल्या रुग्णालयांची निवड करण्यात आली असून, यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या आरोग्य सेवांवर अवलंबून आहेत. महापालिकेचे ५४ बाह्यरुग्ण विभाग आणि १९ प्रसूतिगृहे शहरातील विविध भागांत कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये दररोज सुमारे ११ ते १२ हजार रुग्ण उपचारासाठी येतात.
मात्र, अनेक ठिकाणी अपुरी साधनसामग्री, मनुष्यबळाची कमतरता आणि प्रशासकीय विलंबामुळे आरोग्य सेवा मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. महापालिकेकडे सध्या कमला नेहरू रुग्णालय हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय आहे. वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता इतर निवडक रुग्णालयांचेही उन्नतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडलेल्या रुग्णालयांची महापालिकेच्या भवन विभाग आणि विद्युत विभागामार्फत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्युत व्यवस्था तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या रुग्णालयांचा समावेश
या ११ दाखान्यांमध्ये येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय, वडगाव येथील लायगुडे रुग्णालय, बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय आणि गाडीखाना येथील मालती काची रुग्णालय यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, भवानी पेठ येथील सोनवणे प्रसूतिगृह, राजमाता जिजाऊ नर्सिंग होम, धनकवडी रुग्णालय, वानवडी येथील शिवरकर रुग्णालय, कोथरूड येथील सुतार रुग्णालय आणि बोपोडी येथील खेडेकर रुग्णालय यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.





