Pune Temperature – आठवड्यापासून सूर्यनारायण आग ओकत असून परिणामी कमाल तापमान ४२ अंशापर्यंत पोहचले. रणरणत्या उन्हामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून लोहगाव पाठोपाठ आता शिवाजीनगरचा पाराही ४० अंशाच्या पुढे गेला. शुक्रवारी उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारच्या सुमारास ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळाला. आभाळ भरून येत असल्याने वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यात भर पडली आहे. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सलग पाचव्या दिवशी उन्हाचा चटका असह्य झाला असून, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात काही अंशी कमी-अधिक बदल होईल. तापमान लोहगाव ४१.५, शिवाजीनगर ४०.३, चिंचवड ३९.८, वडगावशेरी ३९.५, राजगुरूनगर ३९.४, बालेवाडी ३९.२, हवेली ३८.९, आंबेगाव ३८.६, गिरीवन ३८.४, हडपसर ३८.३, एनडीए ३८.२, शिरूर ३७.९ अंश सेल्सिअस उष्माघाताचा धोका कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. विविध रुग्णालयांमध्ये चक्कर येणे, उलट्या, जुलाब, तीव्र डोकेदुखी आणि पोटदुखीच्या तक्रारी असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे. गेल्या १५ दिवसात उष्माघाताचे १२० रूग्ण आढळून आले. पुढील काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, सुती कपड्यांचा वापर करावा. आहारात ताक, लिंबू, सरबत यांसारख्या पेयांचा समावेश करावा. दूषीत पाणी, बर्फ आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.