PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार
PMC News: जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान १६ हजार ५३२ कारवाया; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अन् अस्वच्छतेसाठी सर्वाधिक दंड वसूल.

PMC News- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका करणे किंवा राडारोडा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडणार आहे. पुणे महापालिकेने अस्वच्छता करणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या थुंकणे, अस्वच्छता करणे आणि उघड्यावर कचरा टाकणे यासाठी ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत, तर राडारोडा टाकण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
वाढीनंतर नियमभंग करणाऱ्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात १६ हजार ५३२ कारवाया करून तब्बल १ कोटी ८७ लाख ८२ हजार ३२५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणे यासाठी सर्वाधिक ११ हजार ४९९ पावत्या फाडण्यात आल्या असून, त्यातून ९० लाख ३६ हजार ९६१ रुपये दंड वसूल झाला आहे.
बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकणाऱ्यांविरोधात २५६ कारवाया करून ४६ लाख ४४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिकविरोधी कारवाईत ५९१ प्रकरणांत ३ हजार ४१६.९ किलो प्लास्टिक जप्त करून ३१ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांविरोधात २ हजार ८२१ कारवायांतून ५ लाख ७३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
मे महिन्यात सर्वाधिक दंड
मे महिन्यात सर्वाधिक ३६ लाख ७१ हजार ९६५ रुपयांची दंडवसुली झाली. तर फेब्रुवारीत सर्वाधिक २ हजार ९६३ पावत्या फाडण्यात आल्या. कचरा जाळल्याप्रकरणी ४९ कारवायांतून ३ लाख ३० हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी १८८ कारवायांतून १ लाख ८७ हजार ३०० रुपये, तर वर्गीकृत कचरा न दिल्याप्रकरणी १ हजार ६ कारवायांतून २ लाख ८४ हजार ७४० रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेकडून शहरात दंड आकारणीची रक्कम २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार निश्चित केलेली आहे. या दरांना जवळपास दहा वर्षे झाली आहेत. त्यात, वाढ करण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
– संतोष वारूळे (उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग)






