PMC News : ४० कोटींच्या मालमत्तेचा करार ५०० च्या नोटरीवर? महापौरांनी दिले चौकशीचे आदेश
PMC News : बाणेर येथील महापालिकेची ४० कोटींची इमारत एका खासगी संस्थेला विनाभाडे दिल्याने खळबळ; नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सभेत मांडला विषय.

PMC News : बाणेर येथील महापालिकेची ४० कोटींची मालमत्ता केवळ ५०० रुपयांच्या नोटरीवर विनाभाडे खासगी संस्थेला दिल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोमवारी मुख्य सभेत केला. या प्रकरणाची चौकशी करून पुढील सभेत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील आरोग्यसेवेच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी नीलेश निकम, अर्चना पाटील, सचिन दोडके आणि वैशाली भालेराव यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष वेधले. या चर्चेत बालवडकर यांनी बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मधील पालिकेच्या इमारतीतील रुग्णालयात रुग्णांना कोणतीही सवलत दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची कागदपत्रे सादर करूनही एका नवजात बालिकेच्या उपचारासाठी संपूर्ण बिल भरण्याची मागणी रुग्णालयाने केल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयाची इमारत महापालिकेची असून आरोग्य आणि भवन विभागाने केवळ ५०० रुपयांच्या नोटरीवर विनाभाडे दिली आहे.
४० कोटी रुपयांची मालमत्ता वापरूनही त्याचा लाभ नागरिकांना होत नाही. त्यामुळे ही मालमत्ता कोणत्या नियमानुसार रुग्णालया चालविमाऱ्या जेटी फौंडेशनला देण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणीही बालवडकर यांनी केली. नगरसेवक अजय खेडेकर यांनी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये शहरी गरीब योजना,
महात्मा फुले योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आर्थिक फटका बसत असल्याने सर्व रुग्णालयांना शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
रुग्णालयातील खाटांची माहिती मोबाइलवर द्या
महापालिका, पीपीपी, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी आरक्षित खाटांची माहिती नागरिकांना तातडीने मिळावी यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप तयार करण्याची मागणी सभेत करण्यात आली. या अॅपमध्ये रुग्णालयाचे नाव, आरक्षित खाटांची संख्या, उपलब्ध खाटा आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांची अद्ययावत माहिती असावी, अशी सूचना सदस्यांनी केली.





