PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय भवनात शौचालयात दारूच्या बाटल्या आढळल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या लेखा विभागात ओली पार्टी झाल्याचा आरोप झाला होता. या बाटल्या सापडल्यानंतर महापालिका भवानात दारु पिणारे ते कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पिंपरीतील महापालिकेचे मुख्यालय हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे शासकीय ठिकाण आहे. या ठिकाणी असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तैनात आहे. इतकी मोठी यंत्रणा कार्यरत असताना दारूच्या बाटल्या आत गेल्याच कशा ? सुरक्षा यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले की जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांची शिस्त आणि प्रशासकीय देखरेखीचा अभाव समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेची प्रतिमा मलीन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त या घटनेची दखल घेऊन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पालिकेच्या लेखा विभागात ओली पार्टी झाल्याचा आरोप केला होता. या बाटल्यांमुळे पालिकेतील अशा प्रकारांवर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येते. “घडलेला प्रकार चुकीचा असून या संदर्भात संबधित विभागांकडून माहिती मागविण्यात आली आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.” – विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त.