PMC News: ८ दिवस काम अन् दीड कोटींचे बिल? महापालिकेत जलपर्णी काढण्याच्या कामावरून नवा वाद
PMC News: ४ वर्षांत तब्बल ७ कोटी ९७ लाखांचा खर्च, पण नद्यांची स्थिती जैसे थे; यांत्रिकी पद्धतीने जलपर्णी काढण्याच्या दाव्यावर माजी नगरसेवकांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह.

PMC News – मुळा-मुठा नदी आणि विविध तलावातील जलपर्णी यांत्रिकी पद्धतीने काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात किती काम झाले याचा आढावा घ्या आणि मगच बिले अदा करा, अशी मागणी उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नदी, तलावांमधील जलपर्णी यांत्रिकी पद्धतीने काढण्यासाठी गेल्या चार वर्षात सात कोटी ९७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे, असे प्रशासनाने सभागृहात लेखी प्रश्नाला उत्तर दिले परंतु,
परिस्थिती वेगळीच आहे, असे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात जलपर्णी काढली जात नाही. पूर येण्याची वाट पाहिली जाते, जेणेकरून ती जलपर्णी पुढे वाहून जाईल आणि त्यातूनही भिडे पुलापाशी येऊन काही जलपर्णी अडकली तर तेवढीच काढली जाईल, अशी मानसिकता यामध्ये दिसून येते. आठ दिवस काम करून १.५ कोटी बिल काढले जाते.
तसेच ८० टक्के जलपर्णी मांजरी बु. गावाकडे पुढे ढकलून दिली जाते किंवा पुरात वाहून जाते. मग, त्याची बिल काढली जातात, असा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत नवीन तंत्रज्ञानानुसार नेमके किती काम झाले आहे, याचा आढावा आपण घ्यावा आणि मगच संबंधितांची बिले अदा करावीत, अशी मागणी या तिघांनीही आयुक्तांकडे केली आहे.




