Indrayani River – इंद्रायणी नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या जलपर्णीमुळे नदीचे प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांच्या अस्तित्वालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात साचलेल्या जलपर्णीमुळे डास व इतर कीटकांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. त्यामुळे परिसरात मलेरिया, डेंग्यू, ताप, अंगदुखी व डोकेदुखी यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलपर्णीचा जाड थर नदीच्या पाण्यावर पसरल्याने सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचत नाही. परिणामी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असून मासे व इतर जलचरांचा गुदमरून मृत्यू होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नदीतील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे. सांडपाणी तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे जलपर्णी झपाट्याने वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही वनस्पती कुजल्याने नदीपात्रातून उग्र दुर्गंधी पसरत असून पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. जलपर्णीच्या दाट थरामुळे मासेमारी व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. मच्छीमारांना जाळी टाकणे कठीण होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीतील प्रदूषित पाण्यामुळे शेतीपिकांनाही फटका बसत असल्याची तक्रार शेतकर्यांकडून केली जात आहे. दरम्यान, भीमा नदीप्रमाणेच काही ठिकाणी वाहून आलेली जलपर्णी पुलांच्या खांबांमध्ये अडकत असल्याने पुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नदीपात्रातील जलपर्णी तातडीने हटवण्यासाठी यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.