PMC Hospital: साडेचार कोटी फुंकले, तरी ६ वर्षांपासून प्रसूतीगृह बंदच; पुणे पालिकेचा अजब कारभार
PMC Hospital: २०१९ मध्ये सुरू झालेले ४.७२ कोटींचे काम २०२६ मध्येही रखडलेलेच; गोखलेनगर, जनवडी परिसरातील महिलांना खासगी रुग्णालयांचा आसरा.

PMC Hospital : महापालिकेने ४.७२ कोटी खर्चून वडारवाडी येथील डाॅ. होमी भाभा हाॅस्पीटलच्या नुतनीकरणाचे काम २०१९ मध्ये सुरू केले. २०२६ साल निम्मे झाले तरी याचे नुतनीकरण झाले नसल्याने हे काम आणखी किती काळ सुरू राहणार याचे कोणतेही निश्चित उत्तर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. राष्ट्रवादी काॅग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी जून महिन्याच्या मुख्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती मिळाली आहे.
आर्थिक दुर्बल कुटूंबातील महिलांसाठी पालिकेची प्रसूतीगृहे वरदान ठरतात. वडारवाडीतील डाॅ. होमी भाभा हाॅस्पीटल गेल्या सहा वर्षांपासून बंद असल्याने गोखलेनगर, जनवडी, वडारवाडी, माॅडेल काॅलनी, वैदूवाडी परिसरातील महिलांना इतर रूग्णालयांचा अथवा खासगी रूग्णांचा आधार घ्यावा लागत आहे. महापालिकेने जुनी इमारत २०१८-१९ मध्ये पाडली. त्यावेळी प्रसूतिगृहात एक ऑपरेशन थिएटर आणि १० बेडची सुविधा होती.
तेथे दरमहा सरासरी १२ महिलांची प्रसूती होत होती. परिसरातील महिलांसाठी ही महत्त्वाची आरोग्य सेवा होती. प्रसूतिगृहाची जुनी इमारत दोन मजली होती. त्यानंतर येथे चार मजली इमारत बांधण्याचा निर्णय झाला. त्यानंतर केवळ ९०० चौरस फूटांनी हाॅस्पीटलचे बांधकाम वाढले. नवीन इमारतीची बहुतांश जागा लिफ्ट, स्टोअर रूम, जिना तसेच गॅलरीत गेली आहे.
दोन मजले वाढविल्यानंतरही हाॅस्पीटलची क्षमता १० वरून अवघे २० बेड झाली असून ऑपरेशन थिएटरचे कामही अर्धवटच आहे. पहिल्या मजल्यावर सल्ला कक्ष आणि प्रयोगशाळा, दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, पोस्ट ऑपरेशन कक्ष, तर तिसऱ्या मजल्यावर वॉर्डची सुविधा आहे. इतक्या मोठ्या खर्चानंतरही प्रसूतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग (आऊ पेशंट डिपार्टमेंट -ओपीडी) कार्यरत असून प्राथमिक तपासणी,
औषधोपचार, बालकांचे लसीकरण, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, रक्त तपासणी, कुटुंब नियोजन सेवा आणि क्षयरोग तपासणी अशा मर्यादित सुविधा दिल्या जातात. सहा वर्षांपासून प्रसूती सेवा बंद असल्याने परिसरातील गर्भवतींना इतर शासकीय किंवा खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. नव्या इमारतीत प्रत्यक्ष प्रसूती सेवा कधी सुरू होणार याबाबत महापालिकेचा भवन विभाग तसेच आरोग्य विभागाकडे कोणतेही उत्तर नाही.






