Drainage Water Leakage: पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी! ‘या’ भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, आयुक्तांचे तातडीचे आदेश
Drainage Water Leakage: पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन एकाच पातळीवर आल्याने सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्यात; मनपा आयुक्तांकडून तातडीने उपाययोजनांचे निर्देश.

Drainage Water Leakage – पाणीपुरवठा कमी दाबाने, कमी वेळ येत असल्याच्या तसेच मैलामिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारीही अनेक नागरिकांनी केल्या आहेत, खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शहरभर व्यापक सर्वेक्षण केले. यामध्ये कोंढवा, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, हडपसर, कात्रजमधील संतोषनगर, अंजनीनगर आदी भागांत काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे दिसून आले.
प्राथमिक तपासणीत जुन्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांतील पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था अत्यंत जीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले, या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, दत्तवाडी आणि राजेंद्रनगर परिसरात अनेक दिवसांपासून अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागांत नळातून घाण पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
याठिकाणीही तातडीने तांत्रिक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेली कामेही प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइन अत्यंत जवळ किंवा एकाच पातळीवर टाकण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज लाइनमधील गळती, तर काही ठिकाणी गंजलेल्या पाइपलाइनमुळे सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अरुंद रस्ते, अनियोजित विकास आणि जागेअभावी अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या लाइन ड्रेनेज चेंबर्समधूनच नेण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या मोहिमेसाठी २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात होता. आता, पुन्हा काही भागात प्रश्न कामय राहिल्याच्या तक्रारी असून ती कामे वेगाने करण्याचे आदेश दिल्याचेही जगताप यांनी सांगितले.




