PMPML Vacancies: पीएमपीएमएलचा कारभार रामभरोसे? तब्बल ६० टक्के पदे रिक्त; चालक-वाहकांचा मोठा तुटवडा
PMPML Vacancies: परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम ई-आयकॉन अंतर्गत १,००० नवीन इलेक्ट्रिक आणि १,७०० सीएनजी बसेस खरेदीचे नियोजन सुरू.

PMPML Vacancies – शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) मध्ये एकूण १५ हजार ५१९ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ७ हजार ४६८ पदे भरलेली असून, ८ हजार ५१ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांकडून जून महिन्याच्या मुख्यसभेत पीएमपीबाबत लेखी प्रश्न उपस्थित केले होते.
त्यावर प्रशासनाकडून दिलेल्या महितीमधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला डबघाईला पीएमपीचा कारभार ठेकेदारांच्या खाद्यांवर असून, पीएमपीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पीएमपीकडून दिलेल्या माहितीनुसार प्रशासन विभागात १ हजार ७९५ पैकी १ हजार १३५ पदे रिक्त असून, ६६० पदे भरलेली आहेत.
वर्कशॉप विभागात २ हजार ९०२ पैकी २ हजार १३३ पदे रिक्त असून, ७६९ पदे कार्यरत आहेत. वाहतूक विभागात १० हजार ८२२ पैकी ४ हजार ७८३ पदे रिक्त असून, ६ हजार ३९ पदे भरलेली आहेत. या विभागात चालकांची ३ हजार ३७८ पैकी ९१५, वाहकांची ५ हजार १९६ पैकी १ हजार ८७८ आणि इतर कर्मचाऱ्यांची २ हजार २७५ पैकी १ हजार ९९० पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्षभरात ३९ हजार तक्रारी
महामंडळाकडे १ जून २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नागरिकांच्या ३९ हजार ४१६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर पीएमपीएमएलकडे एकूण १ हजार ९५४ बसेस आहेत. यात ६५८ स्वमालकीच्या, ७६१ भाडेतत्त्वावरील सीएनजी आणि ५३५ भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर सध्या १ हजार ८०० बसेसच कार्यरत असून, उर्वरित बसेस दुरुस्ती व देखभाल कारणांमुळे सेवेबाहेर आहेत.
पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत आणखी १ हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे. यात ९ मीटर क्षमतेच्या २०० नॉन-एसी आणि १२ मीटर बीआरटी प्रकारातील ८०० नॉन-एसी ई-बसेसचा समावेश आहे. तसेच, आयटीएमएस प्रणालीद्वारे बस संचलन नियंत्रण, आधुनिक बसथांबे आणि १ हजार ७०० नवीन सीएनजी बसेस ताफ्यात आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.






