PMC Election: समस्या निवारणासाठी फिरते कार्यालय; बाप्पू मानकर यांचे आश्वासन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आजपर्यंत २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार असून, त्याद्वारे त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवू, असे आश्वासन राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी दिले. प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ – म. फुले मंडईतील प्रचारावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
प्रभाग २५ पेठांचा भाग असून, येथे ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. वाढत्या वयाने प्रश्न सोडविण्यात त्यांना अडचणी येत असल्याने हे फिरते कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे मानकर यांनी जाहीर केले.यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार असून, त्याद्वारे ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्यांची माहिती दिल्यास, संबंधित परिसरास तातडीने भेट देऊन समस्या सोडविण्यात येईल.
समस्या सुटण्यास वेळ लागणार असल्यास, प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल. नागरिक आम्हाला सेवक म्हणून निवडून देणार आहेत. त्याच भावनेतून त्यांची सेवा करण्याचा निर्धार असल्याचे मानकर यांनी सांगितले.
नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा मिळत असून, २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो समस्या सुटल्या आहेत, असे मानकर म्हणाले. दरम्यान, प्रभाग २५ मधील मानकर यांच्यासह भाजपचे स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे भाजपचे उमेदवार घरोघरी नागरिकांशी संवाद साधत आहेत.



