Ganesh Bidkar : महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडल्यावर त्यांच्यावर पक्षाच्या ११९ नगरसेवकांची जबाबदारी देण्यात आली आहे.पालिका निवडणुकीत प्रभाग रचना, उमेदवार निश्चिती, प्रचार यंत्रणा उभारणी तसेच निवडणूक व्यवस्थापनातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गणेश बिडकर यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शहरातील अनेक प्रभागांमध्ये निर्णायक विजय मिळवला.महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर बिडकर यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर होते. मात्र, महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ही संधी त्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे महापालिकेतील सभागृह नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर पक्षाने अनुभवी नेतृत्व म्हणून बिडकर यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली. महापौर निवडणूक पार पडल्यानंतर त्यांची सभागृहनेतेपदी औपचारिक घोषणा होऊ शकते. गणेश बिडकर हे २००२ पासून महापालिकेत सक्रिय असून सातत्याने नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. त्यांनी महापालिकेत कसबा पेठ प्रभाग समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, भाजप गटनेता तसेच सभागृहनेता म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.