PMC News – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक झाली आहे. त्यामुळे, या गावांसह प्रभाग रचना करण्यात आली होती. परिणामी आता महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी पुन्हा बदलणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली असून, त्यात, राजकीय हस्तक्षेपही होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका ४१ प्रभागांमध्ये झाल्या असून, लोकसंख्येच्या निकषावर ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचे प्रभाग आकारने मोठे असल्याने त्यांचे क्षेत्रीय कार्यालयनिहाय विभाजन जिकरीचा विषय ठरणार आहे. महापालिकेची सध्या १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. मात्र, आता हद्दवाढ झाल्याने त्यात वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पालिका प्रशासन काय निर्णय घेणार पुढील काही दिवसांत ठरणार आहे. मिनी महापालिका म्हणून ओळख महापालिकेची क्षेत्रीय कार्यालयेही मिनी महापालिका म्हणून ओळखली जातात. नागरिकांशी संबधित स्थानिक कामे तसेच प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी या उद्देशाने महापालिका आयुक्तांचे अनेक अधिका क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेल्या महापालिका सहायक आयुक्त ( क्षेत्रीय अधिकारी) यांना दिले जातात. प्रभागांची संलग्नता आणि क्षेत्रफळ लक्षात घेऊन त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाची हद्द निश्चित केली जातात. या क्षेत्रीय कार्यालयाकडे अतिक्रमणे काढणे, दैनंदिन स्वच्छता, प्रभागातील तातडीची छोटी कामे, महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी आपल्या हद्दीत महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविणे अशी वेगवेगळी कामे करावी लागतात तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १० लाखांपर्यंतचे खर्चाचे अधिकार असतात. तर क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळे असून त्याची जबाबदारी उपायुक्तांवर असते. महापालिकेत पाच परिमंडळे आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर क्षेत्रीय कार्यालयांची प्रभाग निहाय हद्द निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता त्यात पुन्हा बदल केले जाणार आहेत. नगरसेवकही सरसावले आपला प्रभाग ठराविक क्षेत्रीय कार्यालयातच यावा यासाठी नगरसेवकांकडून महापालिकेत लाॅबिंग सुरू करण्यात आली आहे. अनेकदा प्रभागांची रचना करताना मोडतोड झाल्याने एखादा भाग लांब असतो. अशा वेळी प्रशासनाकडून त्या भागाचा विचार करून तो लांबच्या अंतरावर असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाशी जोडला जातो. त्यामुळे, नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवकांकडून आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातच आपला प्रभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत. विशेषत: वाघोली, खडकवासला परिसरातील गावे, कात्रज परिसरातील नवीन गावे, बाणेर-बालेवाडी आणि सूस-बावधन, मांजरी, केशवनगरचा भाग अशा भागासह मध्यवर्ती पेठांमधील काही प्रभागांची हद्द निश्चित करताना अडचणी निर्माण होणार आहेत.