Pune Congress – काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले आणि कोथरूड येथील प्रभाग क्रमांक ११ रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगरमधून तिसऱ्यांदा निवडून आलेले रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांची पुणे महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे पुण्याचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेऊन गटनेता पदासाठीचा कल घेतला. त्या वेळीच कदम यांच्या नावाला एकमताने संमती मिळाली. गटनेते पदी निवड झाल्यानंतर चंदूशेठ कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत विभागीय आयुक्तांकडे जाऊन पत्र दिले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये कदम हे तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. “गटनेते हे पद जबाबदारी असून, पुणेकरांचा आवाज म्हणून महापालिकेत प्रश्न मांडणार आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी दाखविलेला विश्वास आणि शहर पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या विश्वासामुळे ही संधी मिळाली. शहरात काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न करेन.” – रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, काँग्रेस गटनेते, पुणे मनपा