PMC CCTV project: पुणेकरांची सुरक्षा रामभरोसे? शहरात २ हजार CCTV कॅमेरे बंद; महापालिकेचा भोंगळ कारभार उघड
PMC CCTV project: पुणे महापालिकेने १६ कोटी रुपये खर्चून बसवलेले १,९९८ सीसीटीव्ही कॅमेरे देखभालीअभावी बंद; प्रशासनाकडून दुरुस्तीच्या निविदाच निघाल्या नाहीत.

PMC CCTV project : महापालिकेने एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ दरम्यान शहरात १,९९८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च केला आहे. मात्र, सीसीटीव्ही चालू आहेत की बंद याबाबत प्रशासनाकडे कोणतीही नेमकी माहिती नाही. या सीसीटीव्हीच्या दुरूस्तीच्या निविदाच प्रशासनाने काढल्या नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. वेगवेगळ्या कारणाने सध्या बहुतेक सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. पालिकेकडून नगरसेवकांच्या वाॅर्डस्तरीय निधीतून हे सीसीटीव्ही बसवले होते.
या सीसीटीव्हीच्या स्थितीबाबत ही अवस्था असताना पालिकेने २०२३ आणि २०२४ मध्ये आमदार निधीतून कसबा विधानसभा मतदारसंघात आणखी २५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रियंका शेंडगे यांनी जून महिन्याच्या मुख्यसभेत याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे. याशिवाय, शेंडगे यांनी शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी केलेल्या खोदाईची माहितीही विचारली होती.
दुरूस्ती निविदाच नाहीत
प्रशासनाच्या माहितीनुसार, पालिकेने सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर सर्व सीसीटीव्ही जवळची पोलीस चौकी किंवा पोलीस ठाण्याशी जोडले आहेत. सीसीटीव्हीतील काही निविदांसाठी दोन वर्षे तर काही निविदांसाठी तीन वर्षे देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पालिकेने संबधित ठेकेदाराकडे दिली होती. ही दुरूस्तीची मुदत संपल्यानंतर पुन्हा पालिकेने त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी कोणत्याही निविदा काढल्या नाहीत.
तसेच यातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांनी पालिकेस कळविले असले तरी पालिकेने निधी नसल्याचे कारण देत ते बंदच ठेवले आहेत. अनेक सीसीटीव्हीच्या नेटवर्कच्या केबल तसेच त्यांना वीजपुरवठाही नसल्याने जवळपास सर्वच सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. महापालिकेने यापूर्वी बसविलेल्या सीसीटीव्हीसह सध्या शहरात पोलिसांकडून बसविण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामाची माहितीही विचारण्यात आली होती.
त्यात, केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी पालिकेच्या पथ विभागाने दिली होती. यासाठी एकूण २८ किलोमीटर रस्ते खोदण्यास मंजुरी देण्यात आल्याचे उत्तरात नमूद केले आहेत. या खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पालिकेच्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारामार्फत आतापर्यंत ४० टक्के रस्त्यांचे रिसर्फेसिंग पूर्ण झाले असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या अर्धवट कामाचा पुणेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.






