Ahmedabad Plane Crash : WTC फायनलच्या तिसऱ्या दिवसापूर्वी विमान अपघातातील मृतांना वाहण्यात आली श्रद्धांजली

Ahmedabad Plane Crash WTC Final 2025 Tribute : अहमदाबाद येथे १२ जून रोजी एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे हे विमान लंडनला जाण्यासाठी उड्डाण करताच काही सेकंदातच कोसळले. या विमानात प्रवास करणाऱ्या २४२ पैकी २४१ प्रवाशांनी आपला जीव गमावला. यात भारतीयांसह अनेक परदेशी प्रवासीही होते. या विमान दुर्घटनेनंतर जगभरातील लोक मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. दरम्यान आता लॉर्डसवर सुरु असलेल्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्यातील तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली.
विमान अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी एक मिनिट मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरत अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजलि वाहिली. तिसऱ्या दिवसाचा खेळही काळ्या पट्ट्या बांधून खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू –
Australian and South African players wearing black armbands and observed a moment of silence for Ahmedabad plane victims. pic.twitter.com/DEelygZsr8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
१२ जून रोजी दुपारी १:३८ वाजता एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. या विमानात २३२ प्रवाशांसह १० क्रू मेंबर्स होते. हा अपघात अहमदाबादमधील हॉर्स कॅम्पजवळ, एका सिव्हिल रुग्णालयाजवळ घडला. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सामना पोहोचला एका रोमांचक वळणावर –
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे, तर तो एका अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८ गडी गमावून १४४ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांची एकूण आघाडी २१८ धावांची होती, अशा परिस्थितीत, तिसऱ्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.





