Rajya Sabha TDP : संसदेत प्रभाव वाढवण्याचा प्लॅन; ‘या’ पक्षाकडून राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा
Rajya Sabha TDP : पक्षातील वरिष्ठ पक्षनेत्यांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडू यांनी तिन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा करत त्यांना ए-बी-फॉर्म दिले.

Rajya Sabha TDP : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने (TDP) आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चिंताकायला विजय, भाष्यम रामकृष्ण आणि विद्यमान खासदार सना सतीश यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.
पक्षातील वरिष्ठ पक्षनेत्यांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडू यांनी तिन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा करत त्यांना ए-बी-फॉर्म दिले. या तिन्ही नेत्यांनी संघटनेत दीर्घकाळ कार्य केले आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा जपणाऱ्या नेत्यांना संधी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या तिन्ही नेत्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात…
हेही वाचा : Raveena Tandon : ‘हर हर गंगे’… रवीना टंडनचा आध्यात्मिक अंदाज; स्कूटीवर केला प्रवास
१. चिंताकायला विजय
चिंताकायला विजय हे TDP चे राज्य सरचिटणीस असून त्यांनी यापूर्वी तेलगू युवथा संघटनेचे नेतृत्व केले आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केल्यामुळे त्यांची ओळख निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून आहे. राजकीय व्यवस्थापन आणि प्रशासन विषयाचा त्यांनी भारतासह परदेशातील संस्थांमध्ये अभ्यास केला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी त्यांची गणना केली जाते. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात आणि युवा कार्यकर्त्यांना जोडण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. याच संघटनात्मक कामातील त्यांच्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
२. भाष्यम रामकृष्ण
दुसरे उमेदवार भाष्यम रामकृष्ण हे शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाष्यम रामकृष्ण हेआंध्र प्रदेशातील शिक्षण क्षेत्रातील एक प्रख्यात उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात. ते भाष्यम एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. या समूहाच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये शाळा, ज्युनिअर कॉलेज आणि शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. भाष्यम ग्रुपच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते. राजकीयदृष्ट्या ते पारंपरिक नेते नसले तरी शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याच्या आधारे त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्वाची संधी देण्यात आली आहे.
३. सना सतीश
तिसरे उमेदवार विद्यमान राज्यसभा सदस्य सना सतीश यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सना सतीश हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून आले आहेत. ते उद्योग, पायाभूत सुविधा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांशी संबंधित आहेत. TDP शी त्यांचे दीर्घकाळापासून जवळचे संबंध असून पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. 2022 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. संसदेत उद्योग, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आंध्र प्रदेशच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे ते पक्षाच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक मानले जातात.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चिंताकायला विजय यांनी चंद्राबाबू नायडू आणि नारा लोकेश यांचे आभार मानले. पक्षाने कठीण काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचे सांगत त्यांनी राज्यसभेत आंध्र प्रदेशच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी एनडीए आघाडीने चार राज्यसभा जागांपैकी तीन जागा TDP आणि एक जागा जनसेना पक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयामुळे TDP आघाडी सध्या मजबूत स्थितीत आहे.
राज्यसभेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे सात सदस्य असून TDPचे दोन सदस्य आहेत. मात्र, १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर हे गणित बदलण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीद्वारे TDP संसदेत आपले संख्याबळ आणि प्रभाव वाढवण्याच्या तयारीत आहे.
निवडणूक आयोगाने १० राज्यांतील २४ जागांसाठीच्या निवडणुका आणि रिक्त झालेल्या दोन जागांसाठीची पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानुसार १८ जून २०२६ रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : Odisha : ६ हजारांच्या पगारावरून थेट कोट्यवधींचे घबाड; इंजिनिअरकडे तब्बल २ कोटी कॅश, ५ इमारती अन् १३ प्लॉट्स…






