Sharad Pawar : एलपीजी गॅसच्या दरात वाढ; शरद पवारांनी मोदींवर साधला निशाणा म्हणाले “सामान्य नागरिकांना धक्के…”
Sharad Pawar : अशातच गॅस सिलिंडर महागल्याने गृहिणींसह मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या नव्या दरवाढीची झळ नागरिकांना सोसावी लागणार आहे.

Sharad Pawar : देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले असतानाच केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करून नागरिकांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार असून विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर निशाणा साधला. “महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केला जातो, मात्र टप्प्याटप्प्याने दरवाढ करून सामान्य नागरिकांना धक्के दिले जात आहेत. याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी मोजावी लागेल,” असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.
नव्या दरवाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ आहे. यापूर्वी मार्च महिन्यात सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
हेही वाचा : Nagpur News : आकांक्षाच्या मृत्यूचं गूढ गडद! प्रकरणाला मिळालं नवं वळण; धक्कादायक माहिती समोर
पेट्रोल-डिझेल, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच गॅस सिलिंडर महागल्याने गृहिणींसह मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या नव्या दरवाढीची झळ नागरिकांना सोसावी लागणार आहे.
आगामी काळात आणखी दर वाढणार?
दरम्यान, सरकारी तेल कंपन्या प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे सुमारे 703 रुपयांचा तोटा सहन करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात गॅसच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीतही नुकतीच वाढ करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांत त्याचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. महागाईच्या वाढत्या झळा आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





