हातात पिस्तूल अन्…; पूजा खेडकर यांच्या आईकडून शेतकऱ्यांना दमदाटी; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

IAS Pooja Khedkar| मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे कारनामे उघडकीस येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत असल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत.
तसेच पूजा खेडकर यांनी अपंग असलेले सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचे सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर देखील चर्चेत आल्या आहेत.
व्हिडिओत नेमकं काय आहे?
सध्या मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात त्या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमधील महिला IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर असल्याचंच सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये त्या एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही बॉडीगार्ड देखील दिसत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगितलं जात आहे.
यात काही शेतकरी “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुम्ही असं करू शकत नाहीत”, असं सांगताना ऐकू येत आहेत. पण त्याचवेळी “मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे”, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत. संबधित व्हिडीओ मुळशी तालुक्यातील धडवली गावातील असल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय प्रकरण?
खेडकर कुटुंबाने धडवली गावात २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असं सांगितलं जात आहे. या वादावेळी त्या गावात बाऊन्सर घेऊन गेल्या व त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावल्याचेही बोलवले जात आहे. IAS Pooja Khedkar |
खेडकर कुटूंबियांचं बारामती कनेक्शन समोर
पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. IAS Pooja Khedkar |
वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. खेडकर कुटुंबीयांनी मुळशीमध्येही अरेरावी आणि दमदाटी करुन जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा:





