Pimpri : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात तृतीयपंथीयांची लक्षणीय वस्ती असतानाही त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची कोणतीही सुविधा नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
त्यामुळे तृतीयपंथीयांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या मूलभूत गरजा भागवताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जागृत नागरिक महासंघातर्फे मनपा आयुक्तांकडे स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी संस्था अध्यक्ष नितीन यादव, शहरप्रमुख अशोक कोकणे, सचिव उमेश सनस आणि सदस्य काळूराम भोंडवे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तृतीयपंथीय महिलांच्या स्वच्छतागृहाचा पर्यायी वापर करत असल्याची शक्यता असून त्यामुळे महिलांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
महासंघाच्यावतीने हे निवेदन मनपा आयुक्तांच्या वतीने प्रशासन प्रमुख मनोज लोणकर यांना सादर करण्यात आले. तसेच, शहर अभियंता मकरंद निकम आणि सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले.
यावर सकारात्मक प्रतिसाद देताना शहर अभियंत्यांनी, “सध्या मनपातर्फे एक स्वतंत्र तृतीयपंथीय स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. तसेच, येणाऱ्या काळात नवीन उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहासोबत तृतीयपंथीय आणि दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल,” अशी ग्वाही महासंघाला दिली.





