Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडकरांचं वीज संकट मिटणार; खासदार बारणेंचा मास्टर प्लॅन…’या’ ५ भागांत होणार मोठी सुधारणा
Pimpri Chinchwad News : पिंपरी, चिंचवड, थेरगाव आणि देहूगावात नवीन उपकेंद्रांची निर्मिती; वाढत्या लोकसंख्येनुसार वीज यंत्रणा सक्षम करण्याचे खासदार बारणेंचे आदेश.

Pimpri Chinchwad News – मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळमधील भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन वीज यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. पुढील २० वर्षे डोळ्यासमोर ठेऊन वीज पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार पिंपरी, चिंचवड, थेरगाव, रावेत, तीर्थक्षेत्र देहूगाव येथे उपकेंद्राची निर्मिती केली जाणार आहे. रहाटणीतही उतिउच्चदाब केंद्र सुरु केले जाणार असून नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत.
ताथवडेत अतिउच्चदाब केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेतील विद्युत विषयक कामासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरणाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात आढावा बैठक घेतली. प्रादेशिक संचालक सुनील काकडे, गणेशखिंड विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, ग्रामीणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजय नेते, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, शेखर मुरकुटे, केशव काळुमाळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यावेळी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, मामुर्डीतील उपकेंद्राचे मजबुतीकरण केले जाणार आहे. २२ केव्हीची भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. थेरगाव, चिंचवड, रावेत, पिंपरी येथे उपकेंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत. त्याअंतर्गत विविध कामे सुरु केली आहेत. देहूगाव येथे उपकेंद्राची निर्मिती केली जाणार आहे. ताथवडे येथे अतिउच्चदाब नवीन उपकेंद्र मंजूर आहे. यशदाच्या जागेत हे अतिउच्चदाब हे उपकेंद्र सुरु होणार आहे. येथील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रहाटणीतही उतिउच्चदाब केंद्र सुरु केले जाणार असून नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तळेगाव एमआयडीसीतील आंबीतील अतिउच्चदाब केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. खासदार बारणे म्हणाले, विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विविध कामे हाती घेतली जाणार आहे. विद्युत विषयक कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी ठेवला जातो.
त्यासाठी यंदा १७ कोटींचा निधी ठेवला आहे. प्रधानमंत्री सुर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त लोकांपर्यंत जाऊन रुफटॉप सोलर बसवून द्यावेत. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत जनजागृती करावी. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करुन मीटर बसवावेत. सबस्टेशनसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जास्तीत-जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.
तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा
मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे, उर्से, अंबी, लोणावळा, पवनानगर येथे अति उच्चदाब केंद्र कार्यान्वित आहेत. लोणावळ्यात नांगराव येथे, तळेगाव दाभाडेतील अंबी, माळवाडी, मिंडेवाडी येथे लघुदाब व स्विचिंग उपकेंद्र कार्यान्वित आहे. यामुळे तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरु झाला आहे. भंडारा डोंगर येथे विद्युतीकरणाची एक कोटी ३९ लाखांची कामे पूर्ण केली असल्याचेही बारणे यांनी सांगितले.
गहुंजेत नवीन अतिउच्चदाब केंद्र
मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्युत कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी मोठी निधी मंजूर करुन घेतला जातो. त्यातून विविध कामे केली आहेत. राजमाची गाव विद्युतीकरणासाठी एक कोटींचा निधी मंजूर आहे. वडेश्वर येथे नवीन उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. गहुंजे येथे नवीन अतिउच्चदाब केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे तळेगावातील अति उच्चदाब केंद्रावरील भार कमी होणार असून मावळ तालुक्यातील ग्राहकांना अंखडित वीज पुरवठा होण्यास फायदा होणार आहे. मिडेंवाडीतील अतिउच्चदाब केंद्रामुळे चाकण फेज टू या केंद्राचा भार कमी होऊन तळेगाव एमआयडीसीतील उद्योगांना फायदा होईल. या केंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.






