Pimpri-Chinchwad-Bhosari | गट-तट, नाराजी विसरून तीनही जागांवर विजयश्री खेचून आणणार – महाविकास आघाडी

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला उद्धव ठाकरे पक्षाला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस या घटक पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. ३) पिंपरी चिंचवडमध्ये संयुक्त बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर तीनही पक्षातील नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमाशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीला गट-तट, नाराजी विसरून महाविकास आघाडी एकदिलाने सामोरे जाऊन तीनही जागांवर विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांनी दिली.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सुलभा उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, सुनील गव्हाणे, तुषार कामठे, रवी लांडगे, केसरीनाथ पाटील, तुषार साने, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे, भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत, नेताजी काशिद, दत्तात्रय वाघेरे, कल्पना शेटे यांच्यासह शिवसैनिक व इतर घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
“शहरात पक्षाची ताकत असूनही एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नाराजी दूर झाली असून आम्ही एकदिलाने विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहोत.”
– सचिन अहिर ( उपनेते , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
Maharashtra Election 2024: राज्यात आता 8272 उमेदवार रिंगणात, अखेरच्या दिवशी 983 जणांची माघार
“मी मनापासून शिवसेननेचे आणि विशेषत: सचिन अहिर साहेबांचे आभार मानतो, त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. त्यांनी आणि सर्व शिवसैनिकांनी आघाडीचा धर्म पाळावा म्हणून विशेष प्रयत्न केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकजुटीने आणि एकदिलाने काम करून शहरातील तीनही जागा बहूमताने जिंकतील हा विश्र्वास आहे.”
– डॉ. अमोल कोल्हे(खासदार राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष)




