Aditya Thackeray : “शरद पवारांबद्दल आदरच, पण…,” नाराजीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Aditya Thackeray

Aditya Thackeray : राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आणि नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आदित्य ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि आमचे कौटुंबिक संबंधही जुने आहेत.
मी जी भूमिका मांडली होती ती केवळ पक्षहितासाठी होती. राज्यसभेची ही संधी शिवसेनेला मिळावी यासाठी मी आग्रही होतो, कारण आकडेवारीनुसार आता शिवसेनेला २०२९ पर्यंत पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. माझ्या भूमिकेत कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज भरताना अनुपस्थित राहिल्याबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, ज्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शरद पवारांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा मी उदयपूरला होतो. तसेच काल एका लग्नकार्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही.
यात नाराजीचा कोणताही भाग नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय सर्वांच्या संमतीने झाला असून महाविकास आघाडी एकसंध असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.





