नवी दिल्ली – स्पाईसजेट फ्लाइट SG-723 ने रविवारी बिहारमधील पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाला आग लागली होती. या विमानात 185 लोक होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर आग लागल्याने पाटण्यातच विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंजिनला लागलेल्या आगीमुळे लोकांचा श्वास रोखला गेला होता, मात्र वैमानिकाने अत्यंत धैर्याने विमान सुरक्षितपणे उतरवून लोकांचे प्राण वाचवले आहेत.
विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत विमानातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडताना दिसतात. या आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने ज्या पद्धतीने विमान उतरवले आणि समजूतदारपणा दाखवला ते कौतुकास्पद आहे. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या लँडिंगमध्ये फ्लाइट पायलट मोनिका खन्ना यांचा मोलाचा वाटा होता. फ्लाइटची कमान त्यांच्याच हातात होती. यावेळी बलप्रीत सिंग भाटिया हे त्यांचे सहकारी होते. दोघांनी घाबरून न जाता फ्लाइटचे यशस्वी लँडिंग केले.
मोनिका खन्ना स्पाईस जेट लिमिटेडमधील पायलट आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, मोनिका यांना प्रवास करायला आवडतो तसेच त्यांना फॅशनची देखील आवड आहे. रविवारी, जेव्हा स्पाईसजेट बोइंग 737 च्या इंजिनला आग लागली तेव्हा कॅप्टन मोनिका खन्ना यांनी आग लागलेले इंजिन बंद केले होते. त्यानंतर विमानाचे सुखरूप लँडिंग केले. मोनिका यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.