Pen Khopoli Highway: पेण-खोपोली मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास; ‘इसांबे फाटा’ ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट
Pen Khopoli Highway: वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजनााची गरज; मानकांनुसार गतिरोधक, रिफ्लेक्टर आणि झेब्रा क्रॉसिंग उभारण्याची स्थानिकांची मागणी.

Pen Khopoli Highway – पेण-खोपोली राज्य मार्गावरील इसांबे फाटा हा दिवसेंदिवस अपघातप्रवण ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी कामगार, आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. औद्योगिक वसाहतींकडे जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची दररोज या मार्गावरून ये-जा होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इसांबे फाटा हा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा जोडरस्ता आहे. त्यामुळे कंटेनर, ट्रक, टँकर, बस आणि इतर अवजड वाहनांची या ठिकाणी दिवसभर मोठी वर्दळ असते.
सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी परतीच्या वेळेत वाहतुकीचा ताण अधिक वाढत असल्याने फाट्यावरून रस्ता ओलांडणे किंवा वळण घेणे धोकादायक ठरत आहे. महिला कर्मचारी, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात अनेक औद्योगिक कंपन्या कार्यरत असल्याने हजारो कर्मचारी रोज या मार्गाचा वापर करतात. मात्र फाट्यावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना नसल्याने अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात.
परिणामी, किरकोळ अपघात, अचानक ब्रेक लावण्याच्या घटना आणि थोडक्यात टळलेल्या दुर्घटना सातत्याने घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाकडे या ठिकाणी मानकांनुसार गतिरोधक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रिफ्लेक्टर, झेब्रा क्रॉसिंग आणि इतर वाहतूक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे.
मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आधीच प्रभावी पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून या फाट्यावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घ्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना आळा बसून हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी मिळू शकेल, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“दररोज या मार्गावरून प्रवास करताना भीती वाटते. मोठी वाहने अतिवेगाने येतात. फाट्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी तातडीने गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. यामुळे कामगार, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला मोठा आधार मिळेल.”
– दिपाली दळवी, प्रवासी





