Khalapur News : पाणी वाचवा की रस्ता वाचवा? खालापूरमधील ‘या’ गावातील चित्र पाहून तुम्हीही अवाक व्हाल
Khalapur News : धुळ कमी करण्यासाठी दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; पाणीटंचाईच्या काळात पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने संताप.

Khalapur News – खालापूर तालुक्यातील माडप गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता खालापूर पंचायत समिती माजी उपसभापती यांच्या गावाला जोडणारा असल्याने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर दररोज पाण्याचा मारा केला जात असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना दुसरीकडे मात्र हे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे, हे चित्र चिंताजनक आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
माडप गावाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण झाल्याने प्रवास कठीण बनला असून धुळीमुळे नागरिकांना शारीरिक त्रास होत आहे. धुळ आटोक्यात आणण्यासाठी टँकरने रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारला जातो, मात्र यामुळे खूप पाणी वाया जात आहे. हेच पाणी पाणीटंचाईग्रस्त भागात पोहोचवता आले असते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, जेणेकरून पाण्याची बचत होऊन अनेकांची तहान भागवता येईल.
“माडप गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला असून धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचा फवारा मारत आहोत. रस्त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण व्हावे यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”
– विश्वनाथ पाटील, माजी उपसभापती, खालापूर पंचायत समिती





