PCMC News : साहेब… तुम्ही आता तुकाराम मुंडे व्हा; नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांचा समाचार
PCMC News : सभागृहात नगरसेवकाचा आयुक्तांना सल्ला

PCMC News : शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे. शहरामध्ये गोरगरीबांच्या मुलांसाठी काहीतरी ठोस करण्याची गरज आहे. त्यासाठी आयुक्त साहेब तुम्ही आता तुकाराम मुंडे व्हा असा सल्ला नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना दिला.
महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) पार पडली. यावेळी पुनावळे येथील आरक्षित जागा खासगी संस्थेला भाडेतत्वावर देण्याच्या विषायाला विरोध करण्यासाठी नगरसेवक बोलत होते.
यावेळी सर्वच नगरसेवकांनी महापालिकेत सुरू असलेल्या कारभारावर भाष्य केले. प्रशासकीय राजवटीमध्ये जो चुकीचा कारभार सुरू होता, तसाच कारभार आता देखील काहीअंशी सुरू आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये केलेल्या निविदा प्रक्रिया आता मंजुरीसाठी येत आहेत. त्यावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
Pune District : प्रलंबित प्रश्नांसाठी संघटित लढ्याची गरज : अॅड. निशा शिवुरकर
यावेळी आयुक्तांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेवकांनी बोलून दाखवले. तर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ज्या ठिकाणी त्यांची बदली होईल त्याठिकाणी चांगला कारभार करत नाव कमावले. तर आता असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यभारामुळे चुकीचे काम करणाऱ्यांचे धाबे दणाणाले आहेत.
अशीच ठोस कारवाई पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर व्हावी, तसेच चुकीचे काम करणाऱ्यांना थारा देऊ नये अशी भूमिका नगरसेवकांची होती. ही बाब मांडत असताना कुणाल वाव्हळकर म्हणाले, पुनावळे येथील जागा देत असताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. वाकडमध्ये महापालिकेने अतिशय सुंदर सीबीएसई बोर्डाची शाळा बांधली आहे.
त्याठिकाणी त्या भागातील गोर-गरीबांची मुले शिक्षण घेणार आहेत. अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. जागा खासगी संस्थांच्या घशात घालून उपयोग नाही. शिक्षणासाठी आणि एकूणच शहरात चांगला कारभार करण्यासाठी साहेब आता तुम्हाला तुकाराम मुंडे व्हावं लागेल.





