Pune District : प्रलंबित प्रश्नांसाठी संघटित लढ्याची गरज : अॅड. निशा शिवुरकर
मेळाव्यात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भेडसावणार्या विविध समस्या, शासकीय स्तरावरील अडचणी तसेच कर्मचार्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाच्या घटनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंचर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर संघटितपणे लढा उभारण्याची गरज असून, अन्याय सहन न करता आपल्या हक्कांसाठी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्यच्या राज्याध्यक्षा अॅड. निशा शिवुरकर यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सभासदांचा मेळावा शिनोली येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिवसेनेचे सहजिल्हा संपर्क प्रमुख सुरेश भोर तसेच अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व तालुकाध्यक्ष कलावती पोटकुळे उपस्थित होत्या. मेळाव्यात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भेडसावणार्या विविध समस्या, शासकीय स्तरावरील अडचणी तसेच कर्मचार्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाच्या घटनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी विविध प्रश्न मांडत त्यावरील उपाययोजनांबाबत विचारमंथन केले.
बैठकीत प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्याचा तसेच आवश्यक असल्यास मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
यावेळी सुरेश भोर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत महिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले. मेळाव्यास तब्बल 435 महिला सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सविता वायाळ, भागूबाई गेंगजे, नंदा लोहोकरे, जयश्री बोर्हाडे, जयश्री कोकणे, रंजना वायाळ आणि राधा धोंगडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कलावती पोटकुळे यांनी केले, तर सुमित्रा कोकणे यांनी आभार मानले.





