Tukaram Mundhe : “भडक रंगांची मिठाई खरेदी करू नका, चांदीचा वर्खही तपासा”; तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना सावधानतेचा इशारा
मिठाईवर चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावलेला असल्यास त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यावं. चांदीच्या वर्खाच्या नावाखाली काही ठिकाणी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

Tukaram Mundhe : दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध, मिठाईची रेलचेल आणि नातेवाइकांना गोडधोड देण्याची लगबग सुरू होते. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठांमध्ये पेढे, बर्फी, काजू कतली, गुलाबजाम, रसगुल्ले आणि खव्याच्या मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.
मात्र, याच सणासुदीच्या गर्दीत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांचंही फावतं. मिठाईला आकर्षक दिसण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग, निकृष्ट दर्जाचा खवा आणि बनावट चांदीचा वर्ख यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यंदा दिवाळीचा गोडवा चाखण्यापूर्वीच सावध व्हा!
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना मिठाई आणि खवा खरेदी करताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे, दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुकानात ठेवलेली खव्याची मिठाई खरेदी करू नका, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, भेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात FDA ने राज्यभरात धडक मोहीम राबवली असून, तब्बल 954 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त झाल्याने मिठाई विक्रेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना सावधानतेचा इशारा :
नागरिकांनी गरजेपुरतीच मिठाई खरेदी करावी. दुकानात अनेक दिवसांपासून ठेवलेली मिठाई किंवा दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी खव्याची मिठाई घेणं टाळावं. शक्यतो नामांकित आणि अधिकृत परवाना असलेल्या दुकानांमधूनच मिठाई खरेदी करावी.
मिठाई किंवा खव्याच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख, मुदत आणि आवश्यक माहिती असलेलं लेबल आहे की नाही, हे तपासून घ्यावं. एखाद्या दुकानात भेसळयुक्त पदार्थ विकले जात असल्याचा संशय आल्यास FDA कडे तक्रार करावी. तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
भडक रंगांची मिठाई खरेदी करू नका; चांदीचा वर्खही तपासा :
मिठाईवर चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावलेला असल्यास त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यावं. चांदीच्या वर्खाच्या नावाखाली काही ठिकाणी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. मुंढे यांनी सांगितलेल्या प्राथमिक तपासणीच्या सूचनेनुसार, चांदीचा वर्ख हाताने घासल्यावर तो विरघळून किंवा नाहीसा होतो;
मात्र त्याची वेगळी पातळ फॉईल तयार होत असेल तर तो अॅल्युमिनियम असण्याची शक्यता आहे. मात्र केवळ या चाचणीवरून वर्ख अस्सल असल्याचा अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी महत्त्वाची आहे.
मिठाई खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा :
मिठाई आणि खवा केवळ अधिकृत परवाना असलेल्या दुकानातूनच खरेदी करा.
गरजेपुरतीच मिठाई खरेदी करा. अनेक दिवसांचा साठा करून ठेवणं टाळा.
खव्याची मिठाई दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी असल्यास खरेदी करू नका.
मिठाईच्या पाकिटावरील उत्पादनाची तारीख आणि मुदत तपासा.
अतिशय भडक रंग असलेली मिठाई खरेदी करणं टाळा.
चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावलेल्या मिठाईबाबत विशेष काळजी घ्या.
मिठाईचा वास, रंग किंवा चव संशयास्पद वाटल्यास ती खाऊ नका.







