PMPML Metro: मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीकडून नवीन फीडर बससेवा सुरू
PMPML Metro " २२ नवीन बसथांबे, १२ मार्गांवरून दररोज ६२० बसफेऱ्यांचे नियोजन

पिंपरी – मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) फीडर बससेवेचा विस्तार केला आहे. बुधवार पासून नव्याने ११ फीडर बसमार्ग सुरू करण्यात आले असून, यापूर्वी सुरू असलेल्या एका मार्गाचाही विस्तार करण्यात आला आहे.
या माध्यमातून एकूण १२ मार्गांवरून दररोज ६२० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी २२ नवीन बसथांबे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महामेट्रोकडून माण-हिंजवडी-शिवाजीनगर (पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३) ही मार्गिका ३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या फीडर बससेवेत वाढ केली आहे.
त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना घर, कार्यालय तसेच विविध परिसरांतून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बससेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नवीन बसमार्गांमध्ये पिंपरी मेट्रो स्टेशन ते वाकड चौक मेट्रो स्टेशन, माण एमआयडीसी सर्कल ते निलसॉफ्ट कंपनी, इन्फोसिस फेज ३, म्हाळुंगेगाव बाजीरव पाडळे चौक ते टी.सी.एस माण मेट्रो स्टेशन, इंदिरा विद्यापीठ ताथवडे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन अशा मार्गांचा समावेश आहे.
तसेच कोयतेवस्ती पुनावळे ते पद्मभूषण चौक मेट्रो स्टेशन, लवळे फाटा ते टी.सी.एस माण मेट्रो स्टेशन हिंजवडी (मार्गे पिरंगुट) टी.सी.एस माण मेट्रो स्टेशन हिंजवडी ते ब्लयूरिज सोसायटी (मार्गे माण गाव) आणि मिटकॉन मेट्रो स्टेशन बालेवाडी ते गिर्मेपार्क या मार्गांवरही फिडर बससेवा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय लवळे फाटा ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन, टीसीएस माण मेट्रो स्टेशन ते एम्बसी टेकझोन पार्किंग, मेटकॉन मेट्रो स्टेशन ते चांदगाव आणि जॉयव्हिला सोसायटी माण ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन असे मार्गही सुरू करण्यात आले आहेत.
या सर्व मार्गांवर मिळून २५ नियोजित शेड्यूलनुसार दररोज ६२० बसफेऱ्या चालविण्याचे नियोजन आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात नव्याने २२ बसथांबे देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडसह पुणे आणि हिंजवडी परिसरातील मेट्रो प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. या फिडर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
नव्या फिडर बससेवेची आकडेवारी
नवीन बसमार्ग – ११
विस्तारित जुना मार्ग – १
एकूण मार्ग -१२
नवीन बसथांबे – २२
नियोजित शेड्यूल – २५
नियोजित बसफेऱ्या – ६२०
Rajgurunagar : चासकमानचे आवर्तन 20 नोव्हेंबरनंतर सोडा – आमदार बाबाजी काळे





