PCMC News : स्वीकृत नगरसेवक निवडीला ‘ब्रेक’! मे महिन्याच्या अजेंड्यातून विषयच गायब; भाजपाची नेमकी खेळी काय?
PCMC News : सत्ताधारी भाजपमध्ये नावांवरून एकमत नाही; सलग तीन वेळा तहकूब झालेला विषय आता थेट विषयपत्रिकेतूनच वगळला.

PCMC News – स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपाकडून पुन्हा तहकूब करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात घोषणाबाजी केली होती. सभागृहात विषय चिघळल्यानंतर आता चक्क तो विषय मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेतूनच वगळला आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या विषयाबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका वादात सापडण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने स्वीकृत नगरसेवकांची सात नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. सत्ताधार्यांनी तो विषय ५ मे रोजीच्या तहकूब सभेत सलग तिसर्यांदा तहकूब केला. त्यावर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत महापौरांच्या आसनासमोर जमा होत घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीची तीन नावे घोषित करा.
सत्ताधार्यांनी आपली सात नावे फुरसतीनुसार घोषित करण्याचा निर्णय घ्यावा, असा खोचक सल्लाही विरोधकांनी दिला. मात्र, सत्ताधारी काही नमले नाहीत. महापौर रवी लांडगे यांनी तो विषय पुन्हा तहकूब करत सभा कामकाज सुरू केले. त्यावर गोंधळ वाढल्याने महापौरांनी सभा १५ मिनिटे तहकूब केली.
मे महिन्याची सर्वसाधारण सभा १५ मे रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे. त्या सभेची विषयपत्रिका नगरसचिव विभागाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यात स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषयच वगळण्यात आला आहे. नियमानुसार तहकूब झालेला विषय पुढील सभेत घेतला जातो. मात्र, तो विषयच गायब झाल्याने तो विषय दप्तरी दाखल करण्यात आला आहे का?,
सत्ताधार्यांना स्वीकृत नगरसेवकांची निवडच करायची नाही का? अशा शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, स्वीकृत नगसेवक निवडीचा विषय मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या सभेच्या विषयपत्रिकेवर होता. तसेच, ५ मे रोजीच्या तहकूब सभेतही तो विषय होता. वारंवार तो विषय सत्ताधार्यांकडून तहकूब केला जात असल्याचे दिसत आहे.
“महापौरांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा तहकूब विषय १५ जूनपर्यंत तहकूब केला आहे. त्यामुळे तो विषय मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर नाही. सभागृहात झालेल्या निर्णयाची नगरसचिव विभागाकडून अंमलबजावणी केली जाते.”
– मुकेश कोळप, नगरसचिव





