Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्यांची गय नाही! कठोर कारवाईचे महापौर रवी लांडगे यांचे निर्देश
Indrayani River Pollution: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीतील रासायनिक फेसाची महापौर रवी लांडगे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; संबंधित विभागांना सातत्याने निरीक्षणाचे आदेश.

Indrayani River Pollution – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीमध्ये दिसून आलेल्या फेसाच्या घटनेची महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, गटनेते सचिन गिलबिले, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, नगरसेवक, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर रवी लांडगे म्हणाले, “इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरण अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या कोणत्याही आस्थापनेची गय केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी अशा आस्थापनांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि सातत्याने निरीक्षण ठेवावे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल होणार असल्याने त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि निर्मळ वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही महापौरांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनीही इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “इंद्रायणी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्र असून तिचे पावित्र्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नगरपरिषद नदी स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. प्रशासन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि नागरिकांच्या समन्वयातून इंद्रायणीचे पावित्र्य कायम राखले जाईल,” असे त्यांनी सांगितले.





