PCMC News : महापालिकेच्या सभेत अधिकाऱ्यांचे वाभाडे; श्वेतपत्रिकेच्या मागणीने खळबळ..पाहा नेमकं काय घडलं?
PCMC News : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय राजवटीतील कारभाराचे धिंडवडे; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले.

PCMC News – प्रशासकीय राजवट असताना अधिकारी मस्तवालपणे काम करत होते. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर चुकीची कामे केली. त्यांच्यामुळे महापालिकेचे दायित्व वाढले असून पालिकेची अवस्था दयनीय झाली. भ्रष्टाचार करत ठेकेदारांना काम केलेले नसताना देखील बिले देण्यात आली.
शंभर कोटींचे काम दोनशे-तीनशे कोटींना देत मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवटीतील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. २०) केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते.प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली चुकीची कामे, माजी नगरसेवकांना अधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक यावरून नगरसेवक प्रशासनावर तुटून पडले.
अधिकाऱ्यांना मस्ती आली असून चार वर्षात त्यांनी त्यांचे खिशे भरले असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, ज्यावेळेस नगरसेवक नसतात त्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली संस्था म्हणून पालिकेची काळजी घ्यायची असते. त्यांनी फक्त भौतिक सोयी-सुविधा नागरिकांना मिळतात की नाही यावर देखरेख करायची असते.
मात्र, तत्तकालीन आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी काय कारभार केला आहे, त्याची खुलासेवार माहिती आम्हाला मिळावी. त्यांनी कोणतीही नागरिकांच्या हिताची कामे केली नाहीत. फक्त निविदा काढायच्या, ठेकेदार पोसायचे अन खिसे भरायचे हीच कामे केली आहेत. त्या काळामध्ये ज्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते, त्यांना न देता केवळ मोठी खर्चिक कामे केली आहेत.
आता अधिकारी राजीनामे देऊन जायला लागले आहेत. मात्र, जोपर्यंत श्वेतपत्रिका निघत नाही तोपर्यंत कोणाचाही राजीनामा स्वीकारू नका अशी मागणीही त्यांनी केली. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी श्वेतपत्रिका काढण्याच्या विषयाला दुजोरा देत सन २०१७ पासूनच्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. नगरसेविका नीता पाडाळे म्हणाल्या, चार वर्षात शहरात काहीच कामं झाली नाहीत.
फक्त ठेकेदाराची बिले काढण्यात आली. मोठे प्रकल्प झाले ते नेमके कोणासाठी झाले? आज रस्त्यांची अवस्था चांगली नाही. शहराचे बकालपण वाढले आहे. मग एवढा मोठी निधी कुठे खर्ची झाला? याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय राजवटीमधील कामांची श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे.






