Pimpri : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली; हर्डीकर यांच्याकडे पदभार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची आयुक्त नाशिक कुंभमेळा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. शेखर सिंह यांनी त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
आयुक्त शेखर सिंह यांची सातारा येथून १८ ऑगस्ट २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेत बदली झाली होती. त्यांनी ३ वर्ष आणि २ महिने कालावधी पूर्ण केला. त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच महापालिका आणि राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या बदलीविषयीची चर्चा रंगत होती. तीन वर्षाच्या कार्यकाळात राज्य शासनाचे अनेक पुरस्कार महापालिकेला मिळाले. त्यापैकी स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक तर देशात सातवा क्रमांक मिळवला.
त्यानिमित्ताने दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय मालमत्ताकराच्या सुलभ तंत्रज्ञानास राज्य शासनाचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. मालमत्ता कर संकलन वाढीसाठी राबविलेले नवीन उपक्रम, ऑनलाइन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव आणि जिओ सिक्वेन्सिंग आदी प्रणालीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
वैद्यकीय विभागाला देखील महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५ हा पुरस्कार या कालावधीत मिळाला. त्याचप्रमाणे सार्वजनिक सेवांमध्ये नाविण्यता श्रेणीतील इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशामकांना सेफ इंडिया हिरो प्लस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वेगवान कामकाजासाठी आयुक्त सिंह यांनी ऑनलाइन प्रणाली आणली.
आता आयुक्त सिंह यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्याजागी श्रावण हर्डीकर यांना पदभार देण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडून महापालिकेचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागले आहे.





