PCMC News: ऐन पावसाळ्यात ३८ किलोमीटर रस्ते खोदणार! ‘स्मार्ट सिटी’च्या कंत्राटदारावर प्रशासन इतकं मेहेरबान का?
PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये मान्सून काळात रस्ते खोदाई बंदीच्या नियमांचे उल्लंघन; स्मार्ट सिटीच्या 'फायबर ऑप्टिकल केबल' कामासाठी विशेष मंजुरी.

PCMC News – पावसाळ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणतेही अपघात होऊ नये यासाठी दरवर्षी २५ मे नंतर महापालिका हद्दीत रस्ते खोदाई करण्यास बंदी घातली जाते. यावर्षी देखील पावसाळ्यात रस्ते खोदाई बंद असल्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. असे असताना स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी रस्ते खोदले असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे इतर संस्था, खासगी कंपन्यांसाठी वेगळा आणि स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांसाठी वेगवेगळे नियम का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, तसेच एमएनजीएल, महावितरण आणि अनेक खासगी कंपन्या विविध सेवावाहिन्या व केबल टाकण्यासाठी रस्ते खोदतात. त्यासाठी पालिकेकडून शुल्क आकारून परवानगी दिली जाते.
ही खोदाई व निकृष्ट दर्जाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे दरवर्षी शहरातील रस्त्यांची चाळण होते. म्हणूनच शहरातील रस्ते सुस्थितीत राहावेत, यासाठी दरवर्षी मान्सूनपूर्व रस्ते खोदाई थांबवली जाते. यंदाही १५ मे ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व बाह्य संस्था, पालिकेचे सर्व विभागांकडील भुमिगत सेवावाहिन्यांसाठी प्रत्यक्ष रस्ते खोदाईचे काम बंद ठेवण्यात येऊन, खोदलेले रस्ते तातडीने पुर्ववत करण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले होते.
या नियमावर बोट ठेवून पालिकेने इतर अनेक शासकीय विभाग आणि खासगी कंपन्यांचे खोदाईची परवानगी नाकारली. परंतु, स्मार्ट सिटीच्या कामासाठी विशेष परवानगी दिली. स्मार्ट सिटीकडून फायबर ऑप्टिकल केबल नेटवर्कचे काम रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला दिले आहे. हे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यातच ऐन पावसाळ्यात या कंपनीला म्हणजेच १९ जून २०२६ रोजी ३८ किमी रस्ते खोदाईची विशेष परवानगी देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीचे महाव्यवस्थापक मनोज सेठिया यांनी ही परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे. सल्लागार, आयुक्तांच्या मान्यतेने काही अटी-शर्ती टाकून ही परवानगी दिली गेली. परंतु, यावरून रस्ते खोदाईबाबत महापालिका प्रशासना दुतोंडी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर कंपन्यांना खोदाईसाठी परवानगी दिली जात नाही.
असे असताना केवळ स्मार्ट सिटीचे कंत्राट घेतलेल्या संबधित कंपनीवर प्रशासन इतके मेहेरबान का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ऐन पावसाळ्यात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईला परवानगी देणे हे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या त्यांच्याच आदेशाचे उल्लंघन आहे. तर, ही रस्ते खोदाई ऐन पावसाळ्यात शहरात रस्त्यांची दुरावस्था करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याचाही आरोप होत आहे.
“स्मार्ट सिटी अंतर्गंत आवश्यक फायबर केबल टाकण्यासाठी संबधित कंपनीला आयुक्तांच्या मान्यतेने ही परवानगी दिली आहे. त्यांना खोदाई व केबल टाकताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून अटी-शर्तींसह परवानगी दिलेली आहे. काही महिने शासनाकडून स्थगिती आदेश असल्यामुळे हे काम करण्यास विलंब झाला.”
– मनोज सेठिया, महाव्यवस्थापक (इन्फ्रा), पिं. चिं. स्मार्ट सिटी






