PCMC News: स्मार्ट सिटी की खड्ड्यांची सिटी? पावसाच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडकरांचा जीव टांगणीला; पाहा वास्तव
PCMC News: पालिकेचा ५,५७० खड्डे बुजविल्याचा दावा; मात्र बंदी असतानाही शहरात सेवावाहिन्यांसाठी बेकायदेशीर खोदकाम सुरूच, स्थापत्य विभागाचे नियोजनात अपयश.

PCMC News – शहरात पावसाला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. शहरात सध्या ३७०च खड्डे बुजविण्याचे काम प्रलंबित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे शहराच्या अनेक भागांमध्ये रस्त्याची दूरवस्था झाली आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदाचा पावसाळा वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे,
१५ मे नंतर रस्ते खोदाईला बंदी असतानाही शहरात ठिकठिकाणी खोदाई सुरू आहे आणि या बेकायदेशीर खोदकामाची कोणतीही आकडेवारी स्थापत्य विभागाकडे उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांची स्थापत्य विभागाकडून पाहणी केली असता, शहरात एकूण ५ हजार ९३९ खड्डे पडल्याची नोंद झाली होती. प्रशासकीय दाव्यानुसार, यापैकी ५ हजार ५७० खड्डे डांबर, कोल्ड मिक्स, बीबीएम, पेव्हिंग ब्लॉक आणि कॉंक्रिटचा वापर करून भरण्यात आले आहेत.
मात्र, अद्यापही ३७० खड्डे जसेच्या तसे उघडे आहेत. डागडुजी केलेल्या अनेक रस्त्यांवरही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असल्याने महापालिकेच्या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, पावसाळ्यात पाणी साचणे आणि अपघात टाळण्यासाठी १५ मे नंतर शहरात कोणत्याही नवीन रस्ते खोदाईला परवानगी दिली जात नाही. परंतु, यंदा पाऊस काहीसा लांबल्याची संधी साधत शहरातील विविध भागात रस्ते आणि पदपथ खोदाईचे काम राजरोसपणे सुरू आहे.
विविध सेवावाहिन्या, केबल आणि इंटरनेट फायबर टाकण्यासाठी कंत्राटदारांकडून रस्त्यांची चाळण केली जात आहे. यामुळे धुळीचे साम्राज्य तर वाढले होते. आता दोन दिवसांत पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. तर या खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या अपघातांची मालिका सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शहरात पावसाला सुरूवात झाली असून महापालिकेने उर्वरित ३७० खड्डे युद्धपातळीवर बुजविणे आवश्यक आहे. तसेच, सुरू असलेली बेकायदेशीर खोदाई त्वरित थांबवून संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण
खड्ड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. दुचाकीस्वारांचे घसरून पडण्याचे प्रमाण वाढले असून मणक्याचे आजार जडत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते, मात्र पावसाळ्यापूर्वी साधे रस्तेही नीट करून देऊ शकत नाही, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.






