प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अलीकडे सगळ्या व्यवहारासाठी सर्रासपणे डिजिटल तसेच ऑनलाइन व्यवहार केले जात आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आर्थिक व्यवहारासाठी केवळ रोखीची सक्ती केली जात आहे. रोख रकमेअभावी उमेदवारी अर्ज स्वीकारला जात नसल्याने इच्छुक नाराजी व्यक्त करीत आहेत.महापालिकेचा कारभार १ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईद्वारे केला जात आहे. मालमत्ताकर, पाणीपट्टी, उद्यानातील प्रवेश तिकीट तसेच, विविध शुल्क ऑनलाइन स्वीकारले जात आहे. नागरिकांकडून चहा तसेच, भाजीपाल्याच्या बिलापासून मोठ्या खर्चिक बिलाचे पेमेंट ऑनलाइन केले जात आहे. असे व्यवहार करण्यात आता अशिक्षित लोकही मागे नाहीत. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने डिजिटल प्रणालीला नाकारल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रारूप आणि अंतिम मतदार यादीचे शुल्क ऑनलाइन न घेता रोखीने घेण्यात येत आहे. त्यावरून अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. रोख आणण्यासाठी ऐनवेळी अनेकांना एटीएम केंद्राचा शोध घ्यावा लागतो. तर काहींना पुरेशी रक्कम रोखीने उपलब्ध न झाल्याने माघारी फिरावे लागत आहे. रोखीच्या सक्तीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डिजिटल व्यवहार न करता रोखीची सक्ती केली जात असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यवहारासाठी सर्वत्र डिजिटलचा वापर केला जात असताना निवडणूक विभागानेही आपली कार्यपद्धती अद्ययावत केलेली नाही. पारंपारिक पद्धतीतील रोखीने आर्थिक व्यवहार केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.