Municipal Corporation : महापालिकेत दिवाळी भेटवस्तूंना नो एन्ट्री!
Municipal Corporation :

अधिकाऱ्यांना गिफ्ट देण्यास बंदी; सुरक्षा विभागाला आदेश
Municipal Corporation : दिवाळीनिमित्त महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आता प्रशासनानेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, विकसक आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाई, फराळ, ड्रायफ्रूट्स आणि महागड्या भेटवस्तू देण्याच्या प्रकारांना महापालिकेने चाप लावला आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व कार्यालयांमध्ये अशा भेटवस्तू आणण्यास, स्वीकारण्यास आणि त्यांचे वाटप करण्यास बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
भेटवस्तू देण्यासाठी महापालिकेत येणाऱ्या ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींना पकडून सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्याचा इशाराही दिला जात आहे. भेटवस्तूंच्या आडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेच आता प्रतिबंधात्मक पाऊल उचलत दिवाळी भेटवस्तूंना महापालिकेत प्रवेशबंदी केली आहे.
पुणे महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडून यासंदर्भात महत्त्वाचे कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ मधील तरतुदींचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय सेवेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेकेदार, कंत्राटदार, विकासक, पुरवठादार, सल्लागार, नागरिक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून वैयक्तिक स्वरूपात भेटवस्तू, गिफ्ट व्हाउचर अथवा रोख रक्कम स्वीकारू नये, असे स्पष्ट केले आहे.
केवळ भेटवस्तू स्वीकारण्यावरच नव्हे, तर कार्यालयीन परिसरात अशा वस्तू आणणे आणि त्यांचे वितरण करण्यावरही बंदी घातली आहे. मुख्य इमारतीसह सर्व विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये आणि उपकार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
भेटवस्तूंचे बॉक्स किंवा अन्य वस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन परिसरात प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना सुरक्षा विभागाला दिल्याचे परिपत्रक शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी काढले आहे.





