PCMC Budget 2026 – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक आज (दि. २८) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. अंदाजपत्रक हे केवळ वर्षाचे जमा-खर्चाचे गणित नाही तर शहराच्या प्रगतीचा आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांचा पाया असते. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या गोष्टी अंदाजपत्रकावर अवलंबून असतात. यंदा तब्बल चार वर्षांनंतर लोकनियुक्त कार्यकारिणी हे अंदाजपत्रक सादर करणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, यामध्ये फक्त आकड्यांचा खेळ नको, तर शहराच्या पायाभूत आणि शास्वत विकासासाठी ठोस तरतूद असावी अशी अपेक्षा सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर व्यक्त करत आहेत. गेली चार वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासकराज होते. या काळात मोठ्या प्रमाणावर खर्चिक कामे झाली आहेत. तर दुसरीकडे महापालिकेच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. त्यामुळे श्रीमंत नावलौकिक असलेल्या महापालिकेची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक मोठा वाटा कर संकलन आणि बांधकाम परवानगी विभागाचा असतो. मात्र यंदा हे दोन्ही विभाग आपल्या उद्दिष्टाच्या अर्ध्या वाटेवर देखील पोहचले नसल्याचे चित्र आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेने ६ हजार २५२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, प्रत्यक्षात आजअखेर ४ हजार १५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. करसंकलन विभागाकडून १,०५० कोटींच्या तुलनेत केवळ ४८७.९५ कोटींची वसुली झाली आहे. महानगरपालिका अंदाजपत्रक ( संग्रहित छायाचित्र ) भांडवली जमा या प्रमुख घटकात १,०३२ कोटींच्या तुलनेत फक्त १०१.०५ कोटी रुपये जमा झाले असून, हा सर्वात मोठा फरक आहे. बांधकाम परवाना विभागाकडून ७०० कोटींच्या तुलनेत ४२०.५३ कोटी, तर पाणीपुरवठा विभागाकडून ९९ कोटींच्या तुलनेत ५७.५८ कोटींची वसुली झाली आहे. इतर विभागांकडून २५५ कोटींच्या तुलनेत फक्त १५३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचे समोर आले आहे. आता, लोकनियुक्त कार्यकारिणीच्या पुढे सादर होत असलेल्या अंदाजपत्रकामध्ये अनेक मोठ्या व खर्चिक कामांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे महापालिकेची परिस्थिती आणखी खालावेल. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये मोठा फुगवटा न करता जमा खर्चाचा अंदाज बांधत शहरातील भौतिक सोयी-सुविधांचा विकास करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. करवाढ होणार नाही शहरातील निवासी, व्यावसायिक, मोकळ्या जमिनी, बिगरनिवासी अशा एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद महापालिकेकडे आहे. या मालमत्ता धारकांना २०१३-१४ मध्ये करवाढ करण्यात आली होती. मागील ११ वर्षे कोणतीही करवाढ झाली नाही. यंदा देखील करवाढ होणार नाही. ठेवी मोडणार का? महापालिकेची तिजोरी रिकामी आहे. येत्या महिन्याभरात कर संकलन व बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्न वाढले नाही तर ठेकेदारांची बिले काढण्यासाठी देखील आर्थिक चणचण भासणार आहे. अशा परिस्थिती मोठी भांडवली कामे काढल्यास लोकप्रतिनिधी महापालिकेच्या ठेवींना हात घालण्याची शक्यता आहे. मात्र, ठेवी या महापालिकेची संपत्ती असल्याने त्या मोडू नका अशी मागणी नागरिक करत आहेत. “आज महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता शहराच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे अंदाजपत्रक मांडले जाईल.” – प्रवीण जैन, मुख्य वित्त व लेखा अधिकारी.