PCMC 52 Crore Scam : “बळी फक्त अधिकाऱ्यांचाच का?”; ५२ कोटींच्या प्रकरणाला आता नवे वळण, मनसेचा आंदोलनाचा इशारा
PCMC 52 Crore Scam : जनतेचा पैसा असा वळवणे हा फौजदारी गुन्हा; स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद निलंबित करण्याची मनसे कामगार सेनेची मागणी.

PCMC 52 Crore Scam – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ५२ कोटींच्या निधीबाबत उपसूचना देऊन बिले अदा करण्याचा जो प्रकार समोर आला आहे, हा महापालिकेच्या इतिहासातील अत्यंत गंभीर भ्रष्टाचार आणि नियोजित घोटाळा असल्याचे स्पष्ट होत आहे, या प्रकरणी स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांवरही कारवाई करण्याची मागणी मनसे महापालिका कामगार/कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी केली आहे.
पटेकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक शिस्त आणि नियमांचे पालन करणे हे केवळ अधिकाऱ्यांचेच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचेही कर्तव्य आहे. अधिकारांचा गैरवापर करून जनतेच्या करातून जमा झालेला पैसा अशा प्रकारे वळवणे हा फौजदारी गुन्हा असून आयुक्तांना असलेल्या विशेषाधिकारांतर्गत अशा दोषींवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.
या प्रकरणात केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बळी देऊन मूळ सूत्रधारांना मोकळे रान दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या नगरसेवकांनी या उपसूचनेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तेवढेच या घोटाळ्याचे भागीदार आहेत. ‘कायदा सर्वांसाठी समान आहे’ या तत्त्वानुसार, जर अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, तर या लोकप्रतिनिधींवर कारवाई का टाळली जात आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्िथत केला आहे.
या प्रकरणाचा जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही आणि चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित सर्व स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात यावेत. त्यांचे पद निलंबित करून त्यांना महापालिकेच्या कोणत्याही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णयापासून दूर ठेवणे हे निष्पक्ष चौकशीसाठी अनिवार्य आहे. या प्रकरणी सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.





