Ashutosh Sharma Profile : आशुतोष शर्माने पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आशुतोषने 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची शानदार खेळी केली. ही खेळी आशुतोषच्या बॅटमधून तेव्हा आली , जेव्हा पंजाबला खूप गरज होती. याआधी आशुतोष शर्माने 11 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे, तर अखेर कोण आहे आशुतोष शर्मा ? हे जाणून घेऊया….
4 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने 19.1 षटकात 200 धावांचे लक्ष्य पार करून या मोसमात आपला दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पंजाबच्या विजयात असे दोन खेळाडू हिरो बनले ज्यांच्याबद्दल आजपर्यंत फारशी चर्चा झाली नाही, त्यापैकी एक शशांक सिंह आणि दुसरा खेळाडू 25 वर्षांचा आशुतोष शर्मा आहे.
पंजाब किंग्जने लक्ष्याचा पाठलाग करताना 150 धावांपर्यंत 6 विकेट गमावल्या होत्या, अशा परिस्थितीत त्यांनी आशुतोष शर्माला प्रभावशाली खेळाडू (Impact Player) म्हणून मैदानावर पाठवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने अवघ्या 17 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आशुतोषने आपली विकेट गमावली, त्यानंतर शशांक सिंगने विजयाची जबाबदारी स्वीकारली. शशांकसह आशुतोषने सातव्या विकेटसाठी 22 चेंडूंत 40 धावा जोडून संघाला विजय मिळवून दिला. शशांक सिंगनेही 29 चेंडूत 61 धावांची जलद खेळी केली .
अखेर कोण आहे आशुतोष शर्मा? ( Who is Ashutosh Sharma? )
उल्लेखनीय आहे की, रतलामचा रहिवासी असलेल्या आशुतोष शर्माची आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्ज संघाने निवड केली होती. त्याला पंजाब संघाने आयपीएल लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.
चंद्रकांत पंडित ठरले खलनायक…
आशुतोष शर्मा याचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. रतलाममध्ये जन्मल्यानंतर त्यांनी इंदूरमध्ये शिक्षण घेतले. तो सध्या रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्याला 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
नमन ओझानं केली मदत…
त्यावेळी त्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक भूपेन चौहान होते. ज्यांच्या पाठिंब्याने त्याला कठीण काळात प्रेरित केले. गेल्या वर्षी आशुतोषने आपल्या प्रशिक्षकाला गमावले. यानंतर त्याने रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे.
Mumbai Indians : “तर हा वाद…”, हार्दिकला कर्णधार बनवण्यावर रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
11 चेंडूत केले आहे अर्धशतक…
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. तेव्हा तो प्रकाशझोतात आला. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
आशुतोष शर्माची कारकिर्द…
आशुतोष शर्माच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 16 टी-20 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 450 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत आणि यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 196.50 आहे. याशिवाय त्याने सात लिस्ट ए आणि चार प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत.